टेंडर मुरुमाचे प्रत्यक्षात वापर मातीचा करीत असल्याचा आरोप
समाजसेवक फिरोज खान यांची चौकशीची मागणी

पुसद विशेष प्रतिनिधी
पुसद नगरपरिषदेच्या हद्दीत मुरूम टाकण्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निविदेतील कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. संबंधित कामात निकृष्ट व बोगस मुरूम (माती)वापरला जात असल्याचा आरोप समाजसेवक फिरोज खान यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपरिषद हद्दीतील मुरूम टाकण्याच्या कामासाठी निविदा मंजूर करण्यात आली असताना प्रत्यक्ष कामात दर्जाहीन मुरूम (माती)वापरला जात असल्याची बाब निदर्शनास आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासकीय निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये गुणवत्तेशी तडजोड होत असल्यास सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित कामात वापरण्यात येणाऱ्या मुरमाची गुणवत्ता, मंजूर निविदेतील अटी व शर्ती, अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष कामाची पडताळणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्थळ तपासणी करण्यात यावी, अशी मागणी फिरोज खान यांनी केली आहे.
तसेच, कामाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून अहवाल तयार करावा, मुरमाची तांत्रिक तपासणी करावी, मंजूर निविदा व प्रत्यक्ष कामाची पडताळणी करावी आणि अनियमितता आढळल्यास संबंधित कंत्राटदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती नगराध्यक्ष तसेच बांधकाम सभापती, नगरपरिषद पुसद यांनाही देण्यात आल्या आहेत. आता नगरपरिषद प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष कामाची तपासणी करते का आणि चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply