
विशेष प्रतिनिधी:——
सर्जा-राजाचा सण, म्हणजेच बैलपोळा. एरवी अंगणात सनई-चौघड्यांचा निनाद, रंगीबेरंगी झुली, बाशिंग आणि घुंगरांच्या नादाने भारावून जाणारा हा दिवस. पण यंदा या उत्साहावर एक विदारक सावट पसरले आहे. पुसद विधानसभा मतदारसंघा सह संपूर्ण महाराष्ट्रात पोळ्याची लगबग सुरु असली, तरी बळीराजाचे डोळे मात्र आकाशाकडे लागून आहेत. बैलांची शिंगे रंगवताना त्याच्या स्वतःच्या आयुष्याचे रंग मात्र पावसाअभावी कोमेजून गेले आहेत.
. शेती हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. ‘निसर्ग पिकू देत नाही आणि शासन विकू देत नाही,’ या सुलतानी आणि अस्मानी संकटांच्या दुष्टचक्रात शेतकरी पुरता भरडला जात आहे. वाढता उत्पादन खर्च, कर्ज काढून आणलेले महागडे बियाणे, खते आणि मजुरीचा ताण सहन करत त्याने सोयाबीन आणि कापसाचे पीक मोठ्या आशेने उभे केले. मात्र, पिकांना पाण्याची सर्वाधिक गरज असतानाच पावसाने ऐनवेळी दडी मारली आणि शेतकऱ्याच्या
काळजात धस्स झाले.
. पोळा हा केवळ जनावरांचा सण नाही; तर वर्षभर चिखल-मातीत खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या मुक्या सोबत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा कृषिसंस्कृतीचा महाउत्सव आहे. जेव्हा शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची पूजा करेल, त्यांना पुरणपोळीचा घास भरवेल, तेव्हा त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत असेल “यंदा हे उभं पीक वाचेल का?” पावसाचा खंड असाच वाढला, तर सोयाबीन आणि कापसाचे पीक हातून जाण्याची दाट शक्यता आहे. खिशात पैसा नाही आणि डोक्यावर चिंतेचे ओझे, अशा अवस्थेत सणाचा खरा आनंद तरी कसा साजरा होणार?
. या हृदयद्रावक परिस्थितीत आता प्रशासनाने आणि कृषी विभागाने थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणे गरजेचे आहे. पावसाचा खंड आणि संभाव्य नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शेतकऱ्याला तातडीने धीर देण्याची आवश्यकता आहे.
पोळ्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला बळीराजा आज देवाकडे संपत्ती मागत नाहीये. त्याची एकच आर्त हाक आहे, ती म्हणजे काळ्या आईची तहान भागवणारी सुखाची एक सर. जोवर आभाळातून कृपेचा पाऊस बरसत नाही, तोवर सर्जा-राजाच्या गळ्यातील घुंगरांचा नादही शेतकऱ्याच्या कानाला सुन्नच करत राहील.
मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543











Leave a Reply